वेल्हे : वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गाकडून बुधला माचीकडे आडबाजूला तीन गुहा उजेडात आल्या आहेत. त्यामुळे गडदुर्ग प्रेमींसाठी हा कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय झाला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा गडाची उंची व विस्तार पाहता यास प्रचंडगड म्हणून संबोधले जाते. छत्रपतींच्या कार्यकालामध्ये किल्ले तोरणा व राजगड यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक, दुर्ग अभ्यासक, ट्रेकर्स, शिवप्रेमी, किल्ल्यांना भेटी देत असतात. या किल्ल्यांवरती तोफेचे गोळे, शिवकालीन नाणी सापडणे किंवा गुप्त भुयारी मार्ग हे अनेक वेळा सापडले आहेत.
दरम्यान, या गडाच्या मेटपिलावरे मार्गावरील श्री कुंबळजाई मंदिर मार्गे अडगळीच्या झाडाझुडुपांतुन पढेर दांडावर जात असताना स्थानिक नागरिकांना या गुहा दिसल्या. त्यांनी गुहेच्या तोंडाशी असलेल्या झुडपे, माती काढून पहिले असता आत प्रशस्त आकाराची गुहा आढळल्याची माहिती माजी सरपंच हनुमंत पिलावरे यांनी दिली.
हा शिवकालीन असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडाच्या सुरक्षेसाठी गुहांमध्ये चौक्या पायऱ्यांच्या जागा तयार केल्या असाव्यात, असे स्थानिक अभ्यासकांचे मत आहे.
या गुहांमधील एका गुहेत बसण्यासाठी दगडी आसन व्यवस्था असून, मध्यभागी चौक आहे. तर, इतर दोन गुहांमध्ये जाताना गुडघ्यावर वाकत जावे लागते. गुहेच्या आतील अंतराचा अंदाज येत नसून, आतमध्ये गेल्यास जीव गुदमरला जात आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी अति उत्साहात आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी दादू वेगरे यांनी केले आहे.
‘तोरणागडाच्या विकास आराखड्यात किल्ल्यावर अनेक प्रकारची कामे चालू असून, सापडलेल्या गुहा या मुख्य मार्गावर नसून अडगळीच्या मार्गावर वनविभागाच्या हद्दीत आहेत. या गुहांची लवकरच पाहणी करणार आहे.