AAP Supports Uniform Civil Code: देशात सध्या समान नागरी कायदा लागू करण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. समान नागरी कायद्याचा मुद्दा दीर्घकाळापासून भाजपच्या राजकीय अजेंड्यावर आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत उल्लेख केला होता.
आता भाजप (BJP Government) लवकरच हा कायदा लागू करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, एकीकडे मोदी सरकारच्या या मुद्द्याला काँग्रेस, टीएमसी, जेडीयूसह अनेक विरोधी पक्षांनी विरोध केला असताना, दुसरीकडे आम आदमी पार्टीने मात्र, समान नागरी कायदा लागू करण्याला समर्थन दिलं आहे.
समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) आम आदमी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समान नागरी कायदा हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो लागू केल्याने सर्व जाती, समुदाय एकत्र येतील, असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे. ‘आप’ने समान नागरी कायद्याला आपली संमती दर्शवल्याने त्यांच्या निर्णयाने विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का बसू शकतो.
‘आप’चे नेते संदीप पाठक म्हणाले की, “आम्ही तत्वतः समान नागरी संहितेचे (UCC) समर्थन करतो. कारण, कलम ४४ सांगते की देशात समान नागरी कायदा असायला पाहिजे. म्हणूनच सर्व धर्म, राजकीय पक्ष आणि संघटनांशी व्यापक चर्चा करून यावर एकमत व्हायला हवे.”