India vs South Africa 1st T20 2006 : त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडिअमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज पहिला टी20 सामना होणार आहे. भारतासाठी हा सामना खास आहे. कारण, भारतीय संघाचा हा 200 वा टी 20 सामना आहे. याआधी भारतीय संघाने 199 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 127 विजय मिळवले आहेत. टी 20 मध्ये भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 260 आहे. 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात भारताने ही धावसंख्या उभारली होती. टी20 मधील भारताची निचांकी धावसंख्या 74 इतकी आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघ अवघ्या 74 धावांवर आटोपला होता. पण भारतीय संघाचा पहिला टी 20 सामना कधी आणि कुणाविरोधात झाला होता. पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व कोण करत होते ? याबाबत तुम्हाला माहितेय का? आज आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.
भारतीय संघाने पहिला टी20 सामना दक्षिण आफ्रिका विरोधात 2006 मध्ये झाला होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विरेंद्र सेहवाग याच्याकडे होते. या सामन्यात भारतीय संघाने सहा विकेटने विजय मिळवला होता. रोमाचंक सामन्यात भारतीय संघाने फक्त एक चेंडू राखून विजय मिळवला होता. टीम इंडियाकडून दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गोलंदाजीत अजित आगरकर आणि झहीर खान यांनी प्रभावी मारा केला होता.
सामन्यात काय झालं ?
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 126 धावा केल्या होत्या. कर्णधार ग्रीम स्मिथ याने 21 चेंडूत 16 धावा केल्या होत्या. त्याने तीन चौकार ठोकले होते. हर्शल गिब्स याने सात चेंडूत सात धावा केल्या होत्या. एबी डिव्हिलिअर्स याने चार चेंडूत सहा धावा केल्या होत्या. अष्टपैलू एल्बी मॉर्कल याने 18 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले होते.
टीम इंडियाकडून झहीर खान आणि अजित आगरकर यांनी भेदक मारा केला होता. झहीर खान याने चार षटकात फक्त 15 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या होत्या. अजित आगरकर याने 2.3 षटकांत 10 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या, यामध्ये एक षटक निर्धाव होते. श्रीसंतने चार षटकात 33 धावा खर्च करत एक विकेट घेतली होती. सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली होती. हरभजन सिंह याने तीन षटकात 22 धावा दिल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकाने दिलेल्या आ्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. भारतीय संघाने हे आव्हान चार विकेटच्या मोबदल्यात फक्त एक चेंडू राखून पार केले. भारताकडून दिनेश मोंगिया आणि कार्तिक यांनी प्रभावी कामगिरी केली. मोंगियाने 45 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटाकर आणि चार चौकार ठोकले होते. दिनेश कार्तिक याने 28 चेंडूमध्ये 31 धावांचे योगदान दिले. यामध्ये तीन चौकार आणि एक षटकाराचा समावेस होता. सुरेश रैना तीन धावांवर नाबाद राहिला. एमएस धोनी शून्यावर बाद झाला होता. भारतीय संघाने हा सामना सहा विकेटने जिंकला.