Beed News: सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना. गावात कडेकोट बंदोबस्त तैनात. लक्ष्मण हाके यांच्याकडून शांततेचे आवाहन

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी (Materi Village) या मूळगावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. डीजे वाजवण्याच्या वादातून गावातील दोन गट आमनेसामने आल्याने ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मातेरी गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता.

मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी शहरांमध्ये पोलीस दाखल झाले. मात्र, मातेरी शहराच्या दोन्ही बाजूला म्हणजे बीड आणि नगर या दोन्ही दिशेच्या बाजूने रास्तारोको रात्रभर सुरू होते. यानंतर रात्रीपासून मातेरी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये- लक्ष्मण हाके

या घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन केले आहे. लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षणाचं संरक्षण करणाऱ्या दोघांनी कायदा हातात घेऊ नये. शांत राहा, गावाची शांतता बिघडू नका, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच त्यांनी मातोरीच्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. ते बीडच्या तेलगाव येथे बोलत होते.

आम्ही उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गाने आम्ही आमची मागणी मागत आहोत. तरुणांनी कुठलाही कायदा हातात घेवू नका. दगडफेक आणि रस्ता रोको करु नका. गाडी फोडून दहशत माजवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असतील तर मी त्याचा निषेध व्यक्त करतो. संविधानावर विश्वास ठेवा, भीती बाळगू नका. पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था ठेवावी. लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका. रोज एकमेकांची तोंड पाहायची आहेत. भांडण आणि हिंसा हा उपाय नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *