Ajit Pawar Group MLA : आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीत अजित पवारांना मिळणाऱ्या जागांबाबतही भाष्य केलं आहे.

Rohit Pawar on NCP Ajit Pawar Group MLA : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आतापासूनच विधानसभेच्या जागावाटपाबाबात चर्चा सुरू झाल्या आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत दिसणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीनं दणदणीत यश संपादन केलं. महायुतीला मात्र, फारच कमी जागा मिळवता आल्या. लोकसभेत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, तेव्हापासून या ना त्या कारणाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय. विरोधक तर टीका टिप्पणी करतायतच, पण सत्ताधाऱ्यांनीही अजित पवारांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीत अजित पवारांना मिळणाऱ्या जागांबाबतही भाष्य केलं आहे. भाजप अजित पवार गटाला फक्त 20 जागा देईल, असं रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच, नाहीतर भाजप अजित पवारांना स्वतंत्र लढण्यास सांगेल, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बातचित करताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा भाग असलेल्या अजित पवारांना महायुतीतील कार्यकर्ते आणि नेत्यांकडूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. यासंदर्भात बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांच्या भविष्यातील वाटचालीबाबतही वक्तव्य केलं आहे. भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 

अजित पवारांना विरोध होताना पाहायला मिळतंय, पुण्यानंतर इंदापूरमध्ये एका कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांचं नाव घेऊन विरोध दर्शवला. त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “सुरुवातीपासून आम्ही हेच सांगतोय की, भाजप नेहमीच लोकनेत्याला संपवतं आणि अजित पवारांच्या बाबतीत तेच होणार आहे. आता नेतेदेखील अजित पवारांबाबत खूप बोलतात. पण ते फारसं सकारात्मक नसतं. अशातच आता कार्यकर्त्यांनाही धाडसं आलं आहे अजित पवारांबाबत बोलायला. मग आता हे ठरलंय की, मुद्दाम केलं जातंय. अजित दादांना वेगळं करायचं. सर्व जागांवर अजित दादांना उभं करायचं. पाडण्यासाठी उभं करायचं. शरद पवारांचा पक्ष आहे, त्यांची मतं खाण्यासाठी उभं करायचं. पण आमदार एवढे खुळे नाहीत, त्यांनाही माहीत आहे, भाजप त्यांचा कसा वापर करणार आहे. त्यामुळे एकतर अजित पवार भाजपसोबत राहिले, तर त्यांना 20 ते 22 जागा दिल्या जातील. आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील, पण निवडून मात्र कोणीच येणार नाही.”

दरम्यान, लोकसभेत महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही, तेव्हापासून या ना त्या कारणाने अजित पवारांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने अजितदादांवर पराभवाचं खापर फोडलं. शिंदे गटाच्या रामदास कदमांनीही दादांवर तिरकस टिप्पणी केली. आणि आता तर भाजपच्या एका कार्यकर्त्यानं एकवेळ सत्ता नसली तरी चालेल, पण अजितदादांना सत्तेतून हाकला, असा पवित्रा घेतलाय.  

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *