Jalna News: मनोज जरांगे पाटील यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांचा मुक्काम अंतरवाली सराटी गावातील सरपंचाच्या घरी आहे. मात्र, या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचा संशय

जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा राज्यातील प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाळत ठेवली जात आहे का, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या अंतरवाली सराटी गावातील सरपंचांच्या घरी तळ ठोकून बसले आहेत. मात्र, सोमवारी मध्यरात्री  मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या  घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथील आंदोलनस्थळ आणि ते राहत असलेल्या घराची ड्रोनद्वारे (Drone) टेहळणी सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरामुळे अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी मध्यरात्री एक Drone मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली.  या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाचप्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आला होता. 

यापूर्वी जायकवाडी धरणाच्या परिसरातही असाच ड्रोन फिरत असल्याचे दिसून आले होते. अंतरवाली सराटी हे गाव त्याच टप्प्यात येते. अंतरवाली सराटीपासून पैठण धरणही काही अंतरावर आहे. त्यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारा ड्रोन आणि आंतरवाली सराटीतील ड्रोन एकच आहे का, याची पोलिसांकडून माहिती घेतली जाऊ शकते. 

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपण्यासाठी 12 दिवस शिल्लक

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी 8 जूनपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरु केले होते. मात्र, चार दिवसांमध्येच राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी सरकारी शिष्टमंडळाने सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत देत आमरण उपोषण स्थगित केले होते. ही मुदत संपायला आता अवघे 12 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत काही निर्णय घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *