Rashtrawadi New President: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत अशा चर्चा आज सुरु होत्या. आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नसल्याची चर्चा होती.
Jayant Patil
NCP New Chief: आज कोणतीही बैठक झाली नाही, संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. माझं सुप्रिया सुळे यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी आज अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे सांगितले आहे, असे जंयत पाटील यांनी सागितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत अशा चर्चा आज सुरु होत्या. आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नसल्याची चर्चा होती. यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी मला या बैटकीबाबत माहिती नाही. कदाचित मला बैठकीला बोलवण्याची गरज वाटली नसावी, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची बैठक असेल त्यामुळे मला बोलवलं नसेल अशी प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली होती. त्यांनंतर या चर्चांनी जोर धरला होता.
‘मुनगंटीवारांच्या विधानांमध्ये प्रचंड तिरस्कार…’
यावेळी बोलताना जंयत पाटील यांनी मुनगंटीवारांवर देखील टीका केली. जे पद अस्तित्वातच नाही त्याचा राजीनामा दिला म्हणजे काय असं वेगळं केलं अशी टीका मुनगंटीवार यांनी केली होती, त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले. सुधीर मुनगंटीवाराचा राष्ट्रवादीबाबत बोलताना नेहमी तोल का जातो, हेच मला कळत नाही. प्रत्येक गोष्टीत टेक्निकल मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नाही. राजकारण हे लोकांच्या, समाजांच्या मानण्यावर असतं. सुधीर मुनगंटीवारांच्या विधानांमध्ये प्रचंड तिरस्कार दिसतोय. अनेक चुकीची विधानं ते करत आहेत, असे जंयत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी हे सर्वजण करत आहेत. पण अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष (Rashtrawadi New President) कोण होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.