Hingoli News:  राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात उत्पादन घेतलेल्या केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आकाराने मोठी आणि चवीने गोड असल्यामुळे देशभरामध्ये हिंगोलीच्या केळीची मागणी असते. परंतु हेच केळी उत्पादक शेतकरी आता आर्थिक संकटात आढळले आहेत. 

केळी हे पीक शेतकऱ्याला आर्थिक उन्नती देणारे पीक म्हणून ओळखले जाते. जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यात उत्पादन घेतलेल्या केळीची देशभरात ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत या भागामध्ये केळीच्या फळबागांचे मोठे उत्पादन घेतले जातं. हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी 1600 हेक्‍टरवर केळीच्या फळबागांची लागवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात केळीला प्रति क्विंटल 2700-3000 रुपये प्रमाणे दर होते. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आनंदात होते. परंतु आता हे केळीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आता केळी 900-1000 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्याचे अर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे केळीचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील अनेक भागात या केळीचे उत्पादन घेतले जाते. जळगावनंतर हिंगोलीच्या केळीला देशभरात मागणी असते. हिंगोलीची केळी चवदार असल्याने मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात होत असते. परंतु आता भाव घसरल्याने हेच केळी उत्पादक शेतकरी संकटात ओढले आहेत. 

डोंगरकडा गावातील वासुदेव अडकिने हे शेतकरी आहेत. वासुदेव अडकिने त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी अडीच एकर शेतात त्यांनी केळीची लागवड केली. ही केळी पिक करताना त्यांना 2 लाख 50 हजार रुपयांचा खर्च आला आहे. सुरुवातीला केळीला भाव चांगला असल्याने शेतकरी आडकिने समाधानी होते. परंतु आता भाव घसरल्याने केळीचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.  

अशीच परिस्थिती इतर शेतकऱ्यांची आहे. डोंगरकडा येथील शेतकरी नितीन गावंडे यांनी बँकेचे कर्ज काढून केळीची लागवड केली. परंतु भाव घसरल्याने हे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकरी गावंडे यांच्या समोर उभा राहिला आहे 

केळीचे भाव घसरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभे करायचे असेल, तर सरकारने या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. कांद्याप्रमाणे केळीला सुद्धा अनुदान जाहीर करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *