परळी विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का?
Pankaja Munde and Dhananjay Munde: कधीकाळी एकमेकांच्या विरोधात रानपेटवणारे आणि विरोध करण्याची एकही संधी न सोडणारे महाराष्ट्रातल्या राजकारणातले दोघे बहिण भाऊ म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे. सध्या राजकीय वर्तुळात मुंडे बंधू-भगिनी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
परळी विधानसभा निवडणुकीत (Parli Assembly Constituency) एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसं ठरलंय ते म्हणजे परळीचा वैद्यनाथ कारखाना. परळीचा कारखाना दोन बहिण भावाने एकत्र येऊन बिनविरोध केलाय. कारखाना, शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आल्याचं पंकजा म्हणाल्या.
आता कारखान्यात दाखवलेली एकी भविष्यात दोन बहिण भाऊ राजकारणातही दाखवणार का हा प्रश्न पंकजा यांना विचारला असता त्यांनी उत्तर दिले भविष्यात काहीही होऊ शकतं. (Latest Marathi News)
राजकारणात कधी काय होऊ शकतं हे सांगत असतानाच पंकजा मुंडे यांनी धनंजय ज्यावेळेस विधान परिषदेवर आमदार झाले, त्यावेळी मी स्वतः त्यांच्या सत्काराला हजर असल्याचा दाखलाही दिला. शिवाय पातळी सोडून कधी टीका केली नसल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसले. तिथं कटुता दूर झाल्याची चर्चाही झाली. धनंजय आजारी असताना पंकजा मुंडे धनंजय यांची भेट घ्यायला गेल्या. त्यामुळे कारखान्यात जुळलेले सूर भविष्यात जुळणार का हे पाहण्यासाठी आपल्याला विधानसभा लोकसभा निवडणुकीची वाट पाहावी लागेल.