Ambenali Ghat Landslide News : पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरून प्रवास करत असाल तर, सावधान! आंबेनळी घाटात काल (मंगळवार) रात्रीपासून दरडी कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता आणि त्यानंतर बुधवारी सकाळी ७ वाजता दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत होत नाही तोच दुपारच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली आहे.
गेल्या काही तासांपासून मुंबई, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड आणि उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. तर रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. आता आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याच्या (Landslide) घटना घडत आहेत.
प्रवास करताना काळजी घ्या!
आंबेनळी घाटात काही वेळापूर्वीच दरड कोसळली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित यंत्रणांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली. पण त्यानंतर पुन्हा एक किलोमीटरवर दरड कोसळली आहे.
डोंगरावरील मातीचा ढिगारा थेट रस्त्यालगत आला आहे. वाहतूक बंद झाली नसली तरी, दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता वाहनधारकांनी प्रवास करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.