मुंबई : बिहारप्रमाणे आपल्या राज्यातही बंदुकराज सुरू आहे का असा प्रश्न पडतो आणि त्याला कारण म्हणजे गेल्या 48 तासांत झालेल्या गोळीबाराच्या तीन घटनांनी (Maharashtra Firing) महाराष्ट्र हादरून गेला आहे. गोळीबाराची कारणं जरी वेगवेगळी असली तरी राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे वेळीच या घटना रोखल्या नाही तर महाराष्ट्राची ओळख बंदुकराष्ट्र झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
राज्यात कुठे राजकारण, कुठे व्यवहारावरून वाद तर कुठे जल्लोषाची मस्ती… महाराष्ट्रात अवघ्या 48 तासांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला.
बीडमध्ये पॉलिटिकल फायरिंग
गोळीबाराची पहिली घटना घडली ती राजकीयदृष्ट्या तापलेला जिल्हा अशी ओळख असलल्या बीडमध्ये. परळीच्या बँक कॉलनी परिसरात हा गोळीबार झाला. त्यात मरळवाडीचे सरंपच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मरोती गीते आणि महादेव गीते हे गंभीर जखमी झालेत. धक्कादायक म्हणजे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बबन गीते यांनी या दोघांना महादेव गीते यांच्या घरी बोलवून हा गोळीबार केला.
बबन गीते यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करताना 700 गाड्यांचा ताफा नेत जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. तर ग्यानबा गीते यांनी धनंजय मुंडे गटात प्रवेश केला. तेव्हापासूनच वेगवेगळ्या गटात असल्याने दोघात राजकीय वाद असल्याची चर्चा आहे.
नाशकात जल्लोषाची मस्ती
बीडमध्ये ही स्थिती तर दुसरीकडे नाशकात जल्लोषाची मस्ती काय असते त्याचं विदारक दर्शन महाराष्ट्राला झालंय. भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आनंदाच्या भरात दोन गट रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यात झालेल्या राड्यात कोयते नाचवत गोळीबार झाला. या घटनेत एकाच्या पायाला गोळी लागली, तर पाच जण जखमी झाले.
बैलाच्या व्यवहारातून बारामतीत गोळीबार
तिसरीकडे बारामतीत घडलेल्यास घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. निंबुत येथे गौतम काकडे याने बैलाच्या व्यवहारातून केलेल्या गोळीबारात रणजीत निंबाळकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडेला अटक झाली. तर फरार झालेल्या गौतम काकडेचा शोध सुरू झाला.
शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून काकडे आणि निंबाळकर यांच्यात वाद झाला होता. एक वर्षांपूर्वी निंबाळकर यांनी काकडेकडून 61 लाखांना बैल खरेदी केला. जूनमध्ये निंबाळकर यांचा बैल काकडेने 37 लाखांना विकत घेतला. इसार म्हणून 5 लाख दिले, उरलेल्या 32 लाखांवरून वाद आणि गोळीबार झाला आणि निंबाळकरांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. एकीककडे वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरलीय, तर दुसरीकडे पेरण्यांची लगबग सुरू आहे. अशा सगळ्या वातावरणात आवाज घुमतोय तो बंदुकींच्या फायरिंगचा. या तिन्ही घटना घडल्यानंतर अनेकांना मुंबईत झालेल्या घोसाळकर हत्या प्रकरणाची आठवण झाली.
गोळीबाराच्या या वारंवार घडणाऱ्या घटना पाहून सर्वांना एकच प्रश्न पडलाय… हा महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र?