NEET Paper Leak Case : लातूर पोलिसांनी नीट पेपर फुटीप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात यश आलं आहे.

Latur NEET Exam Paper Leak Case : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणी लातुरमध्ये आलेले सीबीआयचे पथक आरोपींचा ताबा घेणार आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मंगळवारी आरोपींचा ताबा घेण्यात येणार आहे  

नीट प्रकरणात CBI च्या पथकाने मुख्य न्यायदंडाधिकारी लातूर यांच्या न्यायालयात आरोपीचा ताबा मिळणेसाठी आज अर्ज केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, आरोपीचा ताबा आणि तपासातील सर्व कागदपत्रे आणि जप्त मुद्देमाल महाराष्ट्र पोलिसांनी CBI कडे देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सोमवारी दिवसभर सर्व कागदपत्राची छाननी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या तपासातील कागदपत्रे यांची वर्गवारी करण्यात आली आहे. या कागदपत्रांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.

काय आहे लातूर नीट प्रकरण? (NEET Paper Leak Latur Connection)

लातूर पोलिसांनी नीट पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आलं आहे. त्यात जलील पठाण आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. फरार आरोपीमध्ये इराण्णा आणि गंगाधर यांचा शोध सुरू आहे. 

या चार जणांनी मिळून लातूर मधील अनेक विद्यार्थ्यांना परराज्यामध्ये नीट परीक्षा देण्यासाठी तयार केलं होतं. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं बोललं जातंय. आरोपींच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचे बारा अॅडमिट कार्ड सापडले आहेत. त्यापैकी आठ अॅडमिट कार्ड ही परराज्यातील आहेत. या आठ अॅडमिट कार्ड पैकी सात अॅडमिट कार्ड बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची असून एक ऍडमिट कार्ड लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं आहे. या टोळीचे कनेक्शन्स देशातील कोणत्या राज्यात आहेत याचा तपास सीबीआय करणार आहे.

नीट प्रकरणाची पाळेमुळे लातुरात

देशात नीट परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघडकील आल्यानंतर त्याची पाळेमुळे लातुरामध्येही असल्याचं सिद्ध झालं. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुण वाढवण्याचं आमिष दाखवून अनेक पालकांकडून प्रत्येकी 4 ते 5 लाख रुपये उकळल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला. या रॅकेटमध्ये सहभागाच्या संशयावरून पोलीस कोठडीत असलेला जिल्हा परिषद शाळेच शिक्षक संजय जाधव, जलील पठाण यांनी चौकशीत धक्कादायक माहिती दिली. 

नीट परीक्षेच्या घोटाळ्यात जिल्ह्याजिल्ह्यात अनेक सबएजंट कार्यरत असल्याची कबुलीही आरोपी शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान यापैकी 28 जणांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र यातीलच काहींनी आपल्या पाल्यांसाठीही पैसे दिलेले असल्याचा खुलासा झाला आहे. 

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *