Bhandara Food Grain Scam Case : भंडारा : भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) भात पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. पण तेवढेच घोटाळे देखील बाहेर येत आहेत. सहा राईस मिलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या धान खरेदी प्रकरणात अपहार झाल्याचा आरोप सध्या केला जात आहे. तसेच, याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या घोटाळ्याचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला. सीबीआयच्या तपासात 12.50 कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे, यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तुमसरचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्या भावाचा ही अटक केलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केल्याचं कागदोपत्री दाखवून शासनाला तांदूळ परत न दिल्याचं आणि शेतकऱ्यांचे खोटे सातबारा आणि खोटी बिलं जोडून अपहार केल्याचं हे प्रकरण आहे. तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी 2018 मध्ये याप्रकरणी सीआयडीकडं तक्रार केली होती. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला. या सर्वांवर कलम 120 (ब), 406, 409, 420, 434, 465, 467, 468, 471 भादंवि नुसार वरठी पोलिसांत गुन्हे दाखल होते. त्या अंतर्गत या सर्वांना अटक करण्यात आली. 

प्रकरण नेमकं काय? 

भरडाईसाठी जिल्ह्यातील सहा राईस मिलकडं धान दिल्याचं कागदोपत्री दाखविण्यात आलं होतं. भरडाईनंतर तांदूळ शासनाकडं परत न करता खोटी बिलं जोडून शेतकऱ्यांच्या नावे रकमेची उचल करण्यात आली होती. हा घोटाळा 12.50 कोटी रुपयांचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही राईस मिल चालकांनी 8.50 कोटी रुपयांचा धान शासनाकडं जमा केल्याचं तपासात आढळून आलं. यात मोहाडी तालुक्यातील सहा राईस मिलचा समावेश आहे. या राईस मिलशी संबंधित असलेली मोहाडी, तुमसर आणि भंडारा तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्रांचे संचालक महेश मनोहर कहालकर, (35) बाम्हणी, ता. तुमसर, सुरेंद्र विठोबा वहीले, (51) मांढळ, ता. तुमसर, ताराचंद कवडू कहालकर (65) बाम्हणी, ता. तुमसर, भारत ज्ञानीराम ठाकरे (58) श्रीरामनगर तुमसर, रामलाल संपत बांडेबुचे (55) सुकळी, ता. तुमसर, माणिक श्रीराम बोंदरे (65), ढोरवाडा, ता. तुमसर यांचा समावेश आहे. तर राईस मिल मालक विश्वनाथ माणिकराव कारेमोरे (43) वरठी) असं अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावं आहेत. विश्वनाथ कारेमोरे हे आमदार राजू कारेमोरे यांचे भाऊ असून ते मोहाडी तालुक्यातील एकलारी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *