Beed News : जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूकीचा प्रचार सुरु, यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून एकमेकांवर निशाणा साधला आहे.
Beed News : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मनोमिलनाच्या बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे दोघं बहिण भाऊ एकाच व्यासपीठावरही एकत्र पाहायला मिळाले. पण या मनोमिलनाला महिना उलटत नाही तो पुन्हा मुंडे भाऊ-बहीण आमने-सामने पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याला बीडच्या परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूक कारणीभूत ठरली आहे. या निवडणुकीच्या प्रचारावरुन मुंडे भाऊ-बहिणीने एकमेकांवर निशाणा साधला आहे.
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असून, यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. “समोरचा पॅनल फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी उभा राहिला आहे. कदाचित एक उमेदवार बिनविरोध निघाला नसता तर बऱ्याच जणांचा कार्यक्रमच उरकला असता. अनेक जणांनी उमेदवारीच मागे घेतली असती. त्यामुळे काहीच काळजी करु नका, विजय आपला निश्चित असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता त्यांच्या याच टीकेला पंकजा मुंडे यांनी देखील उत्तर दिलं आहे. कॉलेज चालवणं सोपं नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
पंकजा मुंडेंकडून प्रत्युत्तर…
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या टीकेला पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, “या निवडणुकीत मी उभी राहिले असून, माझ्या समोरचे उभे राहिले आहेत. त्यामुळे जे कोणी उभं राहिल, त्यांचा प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण कॉलेज चालवणं सोपं नाही. त्या ठिकाणी मुलं मुली येतात, त्यांचं भविष्य आणि सुरक्षितता महत्त्वाची असते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना उत्तर दिले आहे.
पुन्हा वाद…
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद काही नवीन नाही. गेल्या काही वर्षात या दोन्ही भाऊ-बहिणीकडून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे पाहायला मिळाले. पण गेल्या काही दिवसात दोघांमध्ये मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. एवढंच नाही तर दोन आठवड्यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोनदा एकाच व्यासपीठावर आल्याचे दिसून आले. त्यानिमित्ताने बहीण-भावामध्ये जवळीक वाढत असल्याची जोरदार चर्चा होती. पण आता पुन्हा एकदा जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रचारावरुन दोन्ही बहीण-भावात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील मनोमिलन संपलं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.