मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना : मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीची राज्य सरकारला आठवण करुन देण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोलीतून आपल्या शांतता रॅलीला सुरुवात केली आहे. हिंगोलीतील पहिल्याच दिवशी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण समाज म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, असे जरांगे यांनी म्हटले. तर, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील आज परभणी दौऱ्यावर परभणीतही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेही संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांनी मनोज जरांगेंना फोन केला. मात्र, दोघांचे फोनवर बोलणे होऊ शकले नाही. 

मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, जरांगे परभणीत पोहोचले असून जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं. परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांनी यापूर्वीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून मनोज जरांगेमुळे लोकसभा निवडणुकीत आपणास फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, मनोज जरांगे त्याच परभणी शहरातून मराठा समाजाला मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान, संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना फोन केला होता. मात्र, दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. 

ठाकरेंच्या फोनवर काय म्हणाले जरांगे

उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचं मला कळालं, पण माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. मी रॅलीत असल्याने गाडीच्या वरती आहे, गाडीमध्ये माझा फोन आहे. त्यामुळे, माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर येथे जे दोन मुद्दे मांडले, त्या दोन्ही मुद्द्यांशी मी सहमत नसून या ओबीसी नेत्यांसोबत का बसायचे, जाती जातीत भांडण लावले या लोकांनी, त्यांच्यासोबत का बसायचे, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, सरकारला फक्त ओबीसींचा प्रश्न मांडायचा, सोडवायचा आहे आमचा नाही. त्यामुळे, ते यासाठी कशाला फोन करतील असेही जरांगे यांनी म्हटले. जोपर्यंत आमच्या 9 मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही. मेलो तरीही माघार घेणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे

सरकार जातीजातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. सर्व समाजातील जनतेला मी विनंती करतो की आपापसात भांडण करु नका, तुमच्या सर्वांच्या न्याय्य मागणीबरोबर मी असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान उद्याच्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाच्या संदर्भात सर्वमान्य तोडगा काढा, मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटलांना बोलवा, लक्ष्मण हाकेंना बोलवा. त्यांना सांगा खरंच आरक्षण मिळते का? त्यांच्या जीवाशी का खेळता? असे उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये बोलताना म्हटले होते.

By Shiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *