Maharashtra Assembly Election 2024 : स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आज शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत भेट घेतली आहे. या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मनोज जरांगे पाटील आणि आमचे ध्येय एक आहे, वेगवेगळे लढू नये, अपक्ष आमदार सोयीचे राजकारण करतात, ते उभे केल्यास काय धोका होतो, याची जाणीव आम्ही जरांगे पाटील यांना करून दिल्याचे ते म्हणाले. तर जरांगे पाटील यांनी संभाजीराजे यांनी सांगितले की, समाजात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून आपण एकत्र आले पाहिजे, 29 तारखेच्या आधी हे फॉर्म दिले जावे लागतात त्यापूर्वी आपल्याला एकसंघ रहावे लागेल असे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
सकाळी मंत्री उदय सामंतांनी घेतली भेट
छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेण्यापूर्वी शनिवारी सकाळीच मंत्री उदय सामंत हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीत दाखल झाले होते. यावेळी उदय सामंत म्हणाले, मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन आलो होतो. मनोज जरांगे दिवसभर कामात व्यस्त असतात. त्यामुळे मी त्यांना फोन करून वेळ आहे का? अशी विचारणा केली.
आमची भेट राजकीय नव्हे मैत्रीपूर्ण
काल मला समजले आज ते कामातून थोडे मोकळे झालेत. त्यामुळे एक मित्र म्हणून त्यांची भेट घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशाने मी येथे आलो. आता मी मनोज जरांगे यांची रात्री भेट घेतली असती तर बातमी झाली असती. उन्हात भेटलो असतो तर ब्रेकिंग झाली असती. त्यामुळे कसे भेटायचे हा प्रश्नही माझ्यापुढे होता. पण आमची ही भेट राजकीय नव्हती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली, चहा घेतला व निघालो.
सामंत यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा नाही
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी देखील उदय सामंत यांच्याशी राजकीय कोणतीही चर्चा झालेली नाही. केवळ सामाजिक व आमच्या मागण्यासंदर्भात आम्ही भू्मिका मांडली. उदय सामंत यांच्याशी सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर 30 तारखेला निर्णय येईल. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्ही जे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले नाही. आम्हाला आरक्षणाची आस लागली होती. ती फडणवीस यांनी पूर्ण होऊ दिली नाही. आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, पण फडणवीसांनी आरक्षण मिळू दिले नाही, असे ते म्हणाले.